पेठवडगाव/नवे पारगाव/कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. रविवारी (दि. १७) रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार सेंट्रिंग कामगार ठार झाले, तर दोन महिलांसह आठजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. पेठ वडगाव पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले.
बाबालाल इमाम मुजावर (वय ५०), विकास धोंडीराम वड्ड (३२), सचिन धनवडे (४०) आणि श्रीकेश्वर पासवान (६०, सर्व रा. भादोले, ता. हातकणंगले) अशी मृतांची नावे आहेत. तर सचिन पांडुरंग भाट (वय ३०), कुमार तुकाराम अवघडे (४२), भास्कर दादू धनवडे (६०), सविता लक्ष्मण राठोड (१७), ऐश्वर्या लक्ष्मण राठोड (१५), लक्ष्मण मनोहर राठोड (४२) आणि सुनील कांबळे (सर्व रा. भादोले) हे जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
अपघातस्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, भादोले येथील सेंट्रिंग ठेकेदार बाबालाल मुजावर हे रविवारी ११ कामगारांना टेम्पोतून घेऊन कसबा बावडा येथील इमारतीच्या स्लॅबच्या कामासाठी गेले होते. काम संपल्यानंतर सायंकाळी सर्व कामगार काँक्रीट मशीन टेम्पोला जोडून वाठार येथे पोहोचले. वाठार येथील सेवामार्गालगत मशीन लावून ते टेम्पोने भादोले येथे जाणार होते.
मशीन लावण्याचे काम सुरू असतानाच पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने काँक्रीट मशीन आणि टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत रस्त्यावर थांबलेले चार कामगार चिरडले गेले, तर टेम्पोतील कामगारही जखमी झाले. यातील सचिन धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी सर्व जखमींना दोन रुग्णवाहिकांमधून तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, वाटेतच तिघांचा मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील भास्कर धनवडे यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पेठ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक चालकाला ताब्यात घेतले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.