कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उतरण्याची घोषणा केली आहे. ताराराणी पक्षाच्या वतीने आमदार आवाडे हे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. इथं जातीचे कार्ड चालणार नाही, कोण विकास करतो हे कार्ड चालणार असल्याचे ते म्हणाले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढतीने चुरस वाढली असतानाच आता अपक्ष आमदार म्हणून रिंगणात उतरल्याने आता लढत पंचरंगी होणार आहे. त्यामुळे प्रकाश आवाडे रिंगणात शेवटपर्यंत राहिल्यास धैर्यशील माने यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डी. सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर पाचवे उमेदवार प्रकाश आवाडे असणार आहेत.
प्रकाश आवाडे काय म्हणाले?
प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देणार असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, या मतदारसंघात मी परिचित आहे, माझं काम संपूर्ण राज्यात माहिती आहे. कामासाठी माझ्या इचलकरंजीमधील एकही माणूस बाहेर जात नाही. हेच परिवर्तन संपूर्ण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात करणार आहे. एकदाच निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचा निर्धार आवाडे यांनी केला आहे.