कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी मतदारांना आश्वासनं देत आहेत, विकासकामांच्या आणि निधीच्या घोषणा करत आहेत. अनेक पक्ष साम-दाम-दंड-भेद हे धोरण राबवत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील सरपंचांना मतांसाठी सज्जड दम भरल्याचं प्रकरण ताजं असतानाच भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरचे खासदार आणि उमेदवार संजय मंडलिकांसाठी अनोखी शर्यत (पैज) लावली आहे. कागलमधील प्रचारसभेत बोलताना धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिकांना लीड (मताधिक्य) द्या आणि पाच कोटींचा निधी मिळवा अशी ऑफर तालुक्यातील रहिवाशांना दिली आहे.
धनंजय महाडिक यांनी कागल आणि चंदगड या दोन तालुक्यांमध्ये अनोखी शर्यत लावली आहे. महाडिक म्हणाले, कागल तालुक्यात हसन मुश्रीफ आणि स्वतः संजय मंडलिक आहेत. तर चंदगड तालुक्यातही चांगली परिस्थिती आहे. यामुळे संजय मंडलिक यांना कोणत्या तालुक्यातून जास्त मताधिक्य मिळतंय पाहू. मी सर्वांना आवाहन करतो की चंदगड तालुक्यापेक्षा तुम्ही (कागल) जास्त लीड दिलं तर पाच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देऊ. चला तर मग लागली शर्यत… यामध्ये मी आणि संजय मंडलिक आम्ही दोघेही आहोत. मी अडीच कोटींचा निधी देणार आणि संजय मंडलिक अडीच कोटी देतील. या शर्यतीत आम्ही दोघे आहोत हे ध्यानात ठेवा, नाहीतर तुम्ही उद्या मला एकट्याला धराल.
धनंजय महाडिक म्हणाले, राज्यात आणि देशात आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे. हे सरकार म्हणजे आपलं सरकार आहे. जो कोणी जे काही मागेल ते इथे मिळेल.