कोल्हापूर : कोल्हापूरातील सायबर चौकामध्ये 7 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्रभारी कुलगुरूंची आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण यांच्या कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली होती. या अपघातामध्ये वसंत चव्हाण यांचा देखील मृत्यू झाला आहे. माजी कुलगुरूंची तब्येत बरी नसताना देखील ते कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कोल्हापूर पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात कार चालकसह तिघा जणांचा मृत्यू झाला. तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या अपघाताच्या व्हिडीओमध्ये भरधाव कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिल्याचे दिसत आहे. या अपघातामध्ये दुचाकीसह काही व्यक्ती चेंडूसारख्या दूरवर जाऊन पडल्या. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू वसंत चव्हाण ही कार चालवत होते.
सायबर चौक परिसरात आल्यानंतर वसंत चव्हाण यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक व्ही. एम. चव्हाण तथा वसंत मारुती चव्हाण (वय 72), हर्षद सचिन पाटील (16), प्रथमेश सचिन पाटील (19 सर्व रा. कोल्हापूर), अनिकेत आनंद चौगले (रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा) यांचा मृतात समावेश आहे. धनाजी शंकर कोळी (44) आणि त्यांची पत्नी शुभांगी धनाजी कोळी (38, रा. कणेरीवाडी, ता. करवीर) व त्यांचा नातू समर्थ पंकज पाटील (वय 1 वर्ष), मयूर मारुती खोत (रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी) आदी जखमी झाले आहेत.