यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रदान
कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, माजी सनदी अधिकारी तथा साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ट्रस्टच्या सदस्य सचिव मोहिनी चव्हाण, राजदीप सुर्वे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. सुराणा म्हणाले, राजा हा “शासक” असतो, पण शाहू महाराजांनी प्रजेच्या कल्याणासाठी “पालक” म्हणून जीवनभर कार्य केले. राजर्षी शाहू महाराजांना केवळ 28 वर्षे कारभार पाहता आला, पण अल्पकाळातही त्यांनी समाजकल्याणासाठी बहुमोल योगदान दिले. त्यांनी त्या काळात आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, घटस्फोटाचा कायदा आदी क्रांतीकारी कायदे करुन स्त्रियांचे सक्षमीकरण केले. शाहू महाराजांनी संस्थानात केलेल्या अनेक कायद्यांची नंतरच्या काळात देशपातळीवर अंमलबजावणी करण्यात आली. शाहू महाराजांनी दिलेला “क्रियाशीलतेचा” विचार आत्मसात करुन प्रत्येकाने “क्रियाशील” व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, समाजातील पीडित व शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी श्री. सुराणा यांनी संपुर्ण जीवन समर्पित केले आहे. “आपलं घर” च्या माध्यमातून शेकडो व्यक्तींचे ते पालक झाले आहेत. तरुणांना लाजवेल असे व्यक्तिमत्व असणारे पन्नालाल सुराणा हे त्यांच्या कार्याने शाहू महाराजांचे अनुयायी झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक होण्याची आपल्याला गरज आहे, असे सांगून आपण आपल्या देशाचा वारसा मानतो पण त्यानुसार कृती करतो का ? याचा विचार करायला हवा आणि त्यानुसार कृती करण्याची खरी गरज असल्याचे श्री. शिर्के यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
राजर्षी शाहू महाराजांचे कार्य सर्वांसाठी मार्गदर्शक – जिल्हाधिकारी अमोल येडगे
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व क्षेत्रात केलेले कार्य आदर्शवत आणि मार्गदर्शक आहे. शाहू महाराजांनी कार्य केले नाही, असे कोणतेच क्षेत्र नाही. सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अलौकिक आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीला शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. आजवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वांना ट्रस्टच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविले असून शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा प्रसार करण्याचे काम शाहू मेमोरियल ट्रस्ट करत आहे. लोकशिक्षण, समाज प्रबोधन, महिला संघटन व प्रशिक्षण आदी क्षेत्रांतील पन्नालाल सुराणा यांचे कार्य महत्त्वपुर्ण असून ट्रस्टच्या वतीने पुरस्कार प्रदान करणे हा आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी सांगितले.
मोहिनी चव्हाण यांनी मानपत्राचे वाचन केले. राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.