आत्महत्या म्हणजे “स्वतःचे जीवन संपवणे.” जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार दरवर्षी अंदाजे ८ लाख लोक आत्महत्या करतात व दर ४० सेकंदाला कोणीतरी स्वतःचे जीव घेत आहेत. आत्महत्या हे १५ ते २९ वयोगटातील लोकांसाठी प्रमुख कारण बनले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) दरवर्षी १० सप्टेंबर “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस” म्हणून तसेच सप्टेंबर महिना हा “राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक महिना” म्हणून साजरा करण्यात येतो. सन २०२४ ते २६ साठी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची त्रैवार्षिक थीम “आत्महत्येवर कथन बदलणे” ही असून ” संभाषण सुरु करा” या आवाहनासह आहे. या थीमचा उद्देश आत्महत्येचे प्रमाण कमी करणे, कलंक कमी करणे, संस्था, सरकार व लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरुकता वाढविणे व आत्महत्त्या रोखण्यासाठी खुल्या संभाषणांना प्रोत्साहन देणे हे आहे. थोडक्यात मौन आणि कलंकाच्या संस्कतीतून मोकळेपणा, समजुतदारपणा आणि समर्थनाकडे वळा.
आत्महत्येचा विचार नैसर्गिक नसतो. मेंदूतील न्युरोस्ट्रान्समीटर असंतुलीत होतात (सेरोटोनिनची पातळी कमी होते.)
आत्महत्येचे विचार कधी कोणकोणत्या परिस्थितीत येतात?
दिर्घकाळ तणाव, दिर्घकाळ आजार, मानसिक नैराश्य), परिक्षेतील, व्यवसायातील आजार अपयश, कर्जबाजारीपणा व शेतीतील नुकसान, नातेसंबंधातील बिघाड, प्रेमभंग, शारीरिक, लैंगिक,मानसिक छळ, व्यसन (दारु इ.), पुर्वीचा आत्महत्येचा प्रयत्न, भावनाविवश होऊन तडकाफडकी निर्णय.
आत्महत्येची लक्षणे –
सतत बदलणारा मुड, अतिउदासपणा, नकारात्मक विचार येणे व चर्चा करणे, एकलकोंडेपणा, झोप, भूक विस्कळीत होणे, व्यसनाचे प्रमाण वाढणे, दैनंदिन सामाजिक व व्यावसायिक कामामध्ये अनियमितता, जीवन वैफल्य, हताश होणे, निरस, असहाय्यता, निरुपयोगी व निरर्थक वाटणे
आत्महत्येची चिन्हे समजून व ओळखुन घ्या-
२/३ लोक आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या जवळच्या लोकांना आत्महत्येच्या विचारांबद्दल बोलतात, स्वतःला संपवण्याची भाषा आप्तेष्टांसमोर बोललेले असतात. त्यांना धमकावतात, आत्महत्येविषयी बोलणे, लिहणे, पोस्ट करणे इ. गोष्टी करतात, स्वतःला संपवण्याचे मार्ग शोधतात म्हणजेच ऑनलाईन सर्च करणे, किटकनाशके हत्यार किंवा रोप रस्सी इ. गोष्टींची जमवाजमव करतात. निरोपी भाषा बोलतात, मौल्यवान वस्तु देतात, बेफिकीरीपणाने वागतात, मृत्युपत्र तयार करतात.
आत्महत्या रोखण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे मदत कराल ?
शांतपणे समोरच्या व्यक्तीचे ऐकून घ्या, त्याला मनमोकळे करण्यासाठी धीर, संयम द्या. त्यांच्या संपर्कात रहा, एकटे सोडू नका, सुरक्षित ठेवा. (किटकनाशके, औषधे, हत्यारे किंवा इतर साधने) आत्महत्येचे विचार असणाऱ्या लोकांपासून दूर ठेवा, स्वभावामध्ये कोणतेही बदल, लक्षणे, चिन्हे (आत्महत्येची) दिसल्यास त्यांना मानसोपचार तज्ञ, समुपदेशकाकडे त्वरीत घेऊन जाणे.
आत्महत्येचे विचार येत असल्यास स्वतः काय कराल?
स्वतःवर कठोर होऊ नका, आनंदी क्षण, आनंदी दिवसाबद्दल विचार करा, भावनिक बुद्धिमत्ता वाढविणे, म्हणजेच स्वतःची जाणीव, स्वतःबद्दल आदर, प्रामाणिकपणा असणे, आत्मजागृकता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, संयम ठेवणे, लवचिक बनणे, आशावादी राहणे, सकारात्मक मंत्रांचा विचार करणे सगळे दिवस एकसारखे नसतात. ही वाईट वेळ निघून जाईल.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP) हा विभाग सेवा रुग्णालय, कसबा बावडा, येथे सन २०२० पासून कार्यरत आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकांपर्यंत सेवा पोहचविण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, मनशक्ती क्लिनिक अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही मोफत मानसोपचार सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मानसिक आजाराबद्दल कोणत्याही प्रकारचा त्रास असल्यास १४४१६/१८००८९१४४१६ (टेलिमानस टोल फ्री नं.) या हेल्पलाईनची मदत घ्या. तसेच रुग्णालयांमध्ये (आपत्कालीन सेवा) जावून मदत घ्या. याकडे आजार म्हणून पहा…
-डॉ. कुलकर्णी व डीएमएचपी टीम,
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम
जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर
सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर