बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी ४४ कोटी रुपयांच्या निधीच्या मंजुरीची घोषणा केली. अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित ‘वर्ल्ड डिसेबिलिटी डे’ कार्यक्रमात त्यांनी सदर घोषणा केली आहे.
आज श्री कंठीरव सभांगणात आयोजित ‘वर्ल्ड डिसेबिलिटी डे’ कार्यक्रमात त्यांनी हि घोषणा केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “संविधान सर्व नागरिकांना समान संधी देतो. राज्यात सुमारे १५ लाख दिव्यांग व्यक्ती आहेत आणि त्यांचे कल्याण हे सरकारचे कर्तव्य आहे. दिव्यांग व्यक्ती समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, आणि ते अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. विशेषत: पारालंपिक खेळाडूंनी भारतासाठी अनेक पदकांची कमाई केली आहे, हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.”
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार विशेष उत्साही कार्यक्रम आयोजित करत आहे. दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असून दिव्यांग व्यक्ती देवाच्या मुलांसारख्या आहेत. त्यांच्यासाठी आत्मबल प्रेरणादायक आहे. दिव्यांगांचे कर्तृत्व इतिहासाच्या पानांमध्ये आहे आणि आमचे सरकार त्यांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिव्यांग व्यक्तींना विभागाच्या योजनांचा योग्य लाभ मिळवून देण्यासाठी मंत्रालयात सुधारणा केल्याचे सांगितले. सरकार दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिव्यांगांच्या करिअर विकासासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.