Sunday , December 7 2025
Breaking News

धावत्या एसटी बसमध्ये जावयाचा दोरीने गळा आवळून खून; सासू-सासऱ्याला अटक

Spread the love

 

कोल्हापूर : दारू पिऊन मुलीला नेहमी मारहाण करणाऱ्या मद्यपी जावयाचा दोरीने गळा आवळून सासू-सासऱ्यानेच गडहिंग्लज – कोल्हापूर धावत्या एसटी बसमध्ये खून केला. मृतदेह कोल्हापुर एसटी स्टँडवर दुकानाच्या दारात ठेवून सासू-सासरे मध्यरात्री पुन्हा गडहिंग्लजला परतले. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून खूनाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व शाहुपूरी पोलिसांनी लावला. सासरा हणमंतअप्पा यल्लाप्पा काळे (वय ४८) आणि सावत्र सासू गौरा हणमंतअप्पा काळे (वय ३०, दोघेही रा. हुनीगनाळ, भडगांव, ता. गडहिंग्लज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संदिप शिरगावे (वय ३२, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) हा पत्नी करुणा व मुलासह चिंचवाड येथे राहत हाेता. शिरगावे हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यातूनच तो पत्नीबरोबर भांडण काढून वारंवार मारहाण करत होता. मारहाणीला वैतागून त्याची पत्नी करुणा मुलाला घेऊन दोन वर्षापूर्वी गडहिंग्लज येथे माहेरी गेली. शिरगावे हा सुध्दा गडहिंग्लजला सासुरवाडीत येऊन-जाऊन करत होता. चार दिवसापूर्वी पुन्हा तो गडहिंग्लजला गेला. दारू पिऊन पत्नी व मुलाला मारहाण करू लागला. त्यावेळी करूणा यांनी आपल्या वडिलांना पतीचा बंदोबस्त करा, अन्यथा मुलाला घेऊन मी आत्महत्या करेन असे सांगितले. काळे यांनी जावयाला समजावून सांगितले. २५ सप्टेंबरला दुपारी शिरगावे याला पैसे देऊन गडहिंग्लज ते कोल्हापूर एस. टी. बसविले. त्यानंतर ते घरी निघून गेले. परंतू शिरगावे हा पुढच्या स्टॉपवर उतरून पुन्हा सासुरवाडीत गेला. त्यावेळी शिरगावे दारूच्या नशेत धुंद होता. अखेर सासू-सासऱ्याने जावयाला स्वतः एसटीने कोल्हापुरला सोडण्याचा निर्णय घेतला. २५ सप्टेंबरला रात्री गडहिंग्लज ते कोल्हापूर विनावाहक एसटीत तिघेही बसले. त्या तिघांबरोबर इतर दोन प्रवासी होते. काळे दाम्पत्य व इतर दोन प्रवासी पुढे बसले होते. तर भरपूर दारू पिलेल्या अ‍वस्थेत शिरगावे हा एसटीत मागच्या सीटवर बसला होता.
दारूच्या नशेत शिरगावे हा प्रवासादरम्यान सासू-सासऱ्यांनाही शिविगाळ करत होता. त्यामुळे सासरा काळे याने मागच्या सीटवर जाऊन शिरगावे याच्या बॅगेतील एका पॅन्टची नाडी काढली. त्या नाडीनेच शिरगावे याचा गळा आ‍वळला. कागलजवळ घडलेल्या या घटनेत दारूच्या नशेत धुंद असलेल्या शिरगावे जागीच मृत झाला. त्यानंतर काळे हा पुन्हा पुढच्या सीटवर येऊन बसला. रात्री दहाच्या सुमारास एस. टी. कोल्हापुर आगारात आल्यावर याठिकाणी पहिल्यांदा सासू गौरा हिने बाहेर येऊन चाचपणी केली. एस. टी. स्टँडमधील एका दुकानाच्या दारात शिरगावे याची बॅग ठेवली. त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह त्याच दुकानाच्या दारात आणून ठेवला. शिरगावे याचा मृतदेह टाकून दोघेही पुन्हा एसटीने गडहिंग्लजला निघून गेले. रात्री १.३० वाजता ते पोहचले.

गुरूवारी (दि. २६) सकाळी एसटी स्टँडमधील सुरक्षा रक्षकांना एका दुकानाच्या पायरीवर तरूण झोपलेल्या अवस्थेत दिसला. सुरक्षा रक्षकांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठला नाही. संबंधित तरूण मृत झाल्याचे निदर्शनास येताच सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला असता तरूणाच्या गळ्यावर व्रण आढळले. त्यामुळे संबंधित तरूणाचा दोरीने गळा आ‍वळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी एक बॅग मिळाली. तसेच मृताच्या खिशात तपासणी केली असता एक डायरी, गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटीचे तिकीट मिळाले. डायरीत संदिप रामगोंडा शिरगावे असे नाव व एक मोबाईल नंबरही मिळाला. त्यावरून पोलिसांचा तपास सुरू झाला. पोलिसांनी फोन केला असता शिरगावे याच्या पत्नीने फोन उचलला. त्यांना घटनेची माहिती देऊन पोलिसांनी कोल्हापूरला बोलावून घेतले.

दरम्यानच्या कालावधीत शाहुपूरीचे पोलिस निरीक्षक सिंदकर व एलसीबीचे पोलिस निरीक्षक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची पथके तपास करू लागली. पोलिसांनी एसटी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक पुरूष व एक महिला मृतदेह बाहेर काढून ठेवत असल्याचे आढळले. तसेच शाहुपूरी पोलिसांनी शिरगावे याच्याकडे मिळालेल्या एसटी तिकीटानुसार गडहिंग्लज पोलिसांना कळवून तेथील एसटी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासायला लावले. दोन्ही सीसीटीव्हीमध्ये काळे दाम्पत्य आढळल्याने ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. दोघांनीही खुनाची कबूली दिली.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

One comment

  1. माणसातील सह।नशक्ती संपली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *