कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस खासदार राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत राहुल गांधी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले. परंतु या कार्यक्रमापेक्षा राहुल गांधींनी एका छोट्या कार्यकर्त्याच्या घरी दिलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
सकाळी साडे आठ वाजता राहुल गांधी यांचे कोल्हापुर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर उतरताच राहुल गांधींनी कोल्हापूरच्या उचगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांचे घर गाठले. अजित संधे हे काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते तसेच टेम्पोचालक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याच्या कौलारु घरात राहुल गांधी भेटीसाठी आल्याचे समजताच परिसरात त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी जमली. या गर्दीला आवरताना पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला आदि दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी टेम्पोचालक अजित तुकाराम संधे यांच्या कुटुंबियांशी तासभर चर्चा केली. यावेळी संधे यांच्या घरी त्यांनी वांग्याची भाजी अन् कांद्याची पात असा खाद्य बनवला होता, ज्यावर राहुल गांधींनी ताव मारला. राहुल गांधी यांनी घरी दिलेल्या भेटीने संधे कुटुंबीयही चांगलेच भारावुन गेले. काँग्रेस नेत्याच्या या खास भेटीची अन् साध्या पाहुणचाराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.