
कोल्हापूर : महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने “चलो मुंबई”चा नारा देण्यात आला आहे. या मोर्चात कोल्हापूर येथील सर्वपक्षीय नेते सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विजय देवणे यांनी दिली.
सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाने सीमाभागाची बाजू भक्कमपणे मांडावी, कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा, सीमाभागातील ८६५ गावात महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सीमाबांधव व महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते एकत्रितपणे महाराष्ट्र शासनाच्या मार्च महिन्यातील अधिवेशनात मोर्चाने जाऊन विधानभवनावर धडक देणार अश्या पद्धतीचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्ष नेत्यांनी सीमाबांधवांच्या पाठीशी आम्ही व महाराष्ट्रातील सर्व जनता ठामपणाने पाठीशी उभे आहोत तसेच महाराष्ट्रातून या आंदोलनास सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन समितीनेत्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी दिले.
या बैठकीला समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, व्ही. बी. पाटील, वसंत मुळीक, सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, संभाजीराव जगदाळे, शिवाजीराव परुळेकर, बाबुराव कदम आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta