कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कर्नाटक सरकार आणि कन्नड रक्षक वेदिका संघटना विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. काल कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळ फासून चालकाला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती. या गाडीच्या वाहक आणि चालकांना प्रवाशांना सुरक्षित ठेवत दोघेही त्यांना सामोरे गेले. गाडीमधील महिला आणि इतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे तिथून माघारी आणले. दोघे गाडी घेऊन माघारी आल्यावर शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दोघांचा सत्कार केला.
कोल्हापुरात शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानका बाहेर जोरदार आंदोलन झालं. दुपारी 12 च्या सुमारास मारहाण झालेले चालक आणि वाहक कोल्हापुरातील विभागीय कार्यालयात दाखल झाले. दरम्यान कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांना एकट सामोरे जात प्रवाशांना सुरक्षित ठेवल्याने शिवसेना ठाकरेच्या वतीने त्यांचा फेटा बांधून आणि हार घालून सत्कार करण्यात आला. यानंतर चालक भास्कर जाधव आणि वाहक प्रशांत थोरात यांनी घडलेली घटना सांगितली.