Sunday , December 7 2025
Breaking News

शिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजरा

Spread the love

 

शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, जिवंत देखाव्यातून शिवरायांच्या जीवनपटाला उजाळा

कोल्हापूर (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच 6 जून 1674, शिवराज्याभिषेक दिन. या शुभ दिनाचे औचित्य साधून शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी जिल्हा परिषद आवारातील कागलकर वाड्याच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते उभारण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वराज्य गुढीची विधीवत पूजा करून त्याची उभारणी सनई, पोवाड्याच्या जयघोषात करण्यात आली. गुढी उभारणी नंतर जिल्हा परिषद कला मंचाच्या वतीने राष्ट्रगीत व राज्यगीत गायले गेले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शाहीर रंगराव पाटील यांनी अफजलखानाचा वध, पन्हाळगड वेढा, आग्र्यातून सुटका, राज्याभिषेक समारंभ इत्यादी प्रसंगांचे जिवंत देखाव्यातून सादरीकरण केले.

कागलकर वाड्याच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमासाठी आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देषाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेतील खातेप्रमुख, कर्मचारी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. अतिशय उत्साहात, जोमाने सादर केलेल्या विविध प्रसंगांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. एक तास चाललेल्या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील विविध प्रसंग नृत्य व नाटिकेतून सादर करून शिवराज्याभिषेक दिनी त्यांच्या कर्तुत्वाला उजाळा देण्यात आला.

हा सोहळा केवळ ऐतिहासिक घटना नसून, शिवाजी महाराजांच्या न्यायप्रिय शासन, समतावादी विचार आणि स्वराज्याच्या संकल्पनेचा उत्सव आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचं आत्मभान जागं केलं. जनतेच्या मनातलं आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणलं. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेत सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळी मध्ये रिता केला. रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले. त्यामुळे आजही शिवरायांचे स्वराज्य हे भारतीयांच्या मनावर राज्य करते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला, अशा या राज्याचा शिवराज्याभिषेक सोहळा दिव्य स्वरूपात मंचावर उभा करून या कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब माळवे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *