आजरा : बुरुडे (ता. आजरा) येथील भावेश्वरी कॉलनीत गॅस गिझरच्या गळतीमुळे नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सागर सुरेश करमळकर (वय ३२ ) व त्यांची पत्नी सुषमा सागर करमळकर (२६, दोघेही रा. मूळ गाव शिवाजीनगर आजरा) यांचा मृत्यू झाला आहे.
सागरचा विवाह २० मे रोजी झाला आहे. काल तो पत्नीसोबत आंबोलीला फिरण्यासाठी गेला होता. तेथून घरी आल्यानंतर तो फोन उचलत नव्हता व नंतर त्याचा फोन बंद झाला. त्याचे मित्र परिवार आज सोमवार सकाळी बुरुडेपैकी भावेश्वरी कॉलनीतील घरी भेटण्यासाठी गेले. घराचे समोरील दरवाजाला किल्ली अडकवलेली व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. ते आतमध्ये गेले असता गॅसचा वास येत होता. यावेळी दोघेही बाथरूममध्ये पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी करमळकर नवदाम्पत्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta