Sunday , December 7 2025
Breaking News

भर पावसात बळीराजासोबत राबले कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री!

Spread the love

 

पीक उत्पादन वाढीला देणार चालना – पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही

कोल्हापूर (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज भर पावसात डोक्यावरील येरलं बाजूला करत शेतात पावर टिलरद्वारे चिखलगुट्टा (मशागत) करुन वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली.. शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका भाकरी, ठेच्याची चव चाखत शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्याचं चित्र राधानगरीच्या शेतावर दिसून आलं. शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान राबवण्यासाठी व पीक उत्पादन वाढीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. निमित्त होतं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमाचं.. !

पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या संकल्पनेतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त शाहू जयंती पंधरवड्यात कृषी विभाग, जिल्हा प्रशासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुमारे 300 गावात एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले. राधानगरीच्या शेतावर संपन्न झालेल्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भर पावसात अनंत कृष्णा चौगुले यांच्या शेतीच्या बांधावर उतरुन शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडी-अडचणी, व्यथा जाणून घेत.. नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं.

राधानगरी – कागलचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, कृषी महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोककुमार पिसाळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दत्ता उगले, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी राधानगरी मधील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन येथील भात रोपांच्या विविध जातींची पाहणी केली..

या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शिवार फेरी, शेती शाळा, वृक्षारोपण, शेतकऱ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन आदी उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांच्या समस्या, अडी-अडचणी, प्रश्न व त्या त्या गावांतील समस्या, जाणून घेण्यात आल्या. पीएम किसान, ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान अशा महत्त्वपूर्ण योजनांबरोबरच विविध विभागांच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *