
मुंबई : कोल्हापूरच नव्हे तर पंचक्रोशीतील तमाम जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या महादेवी हत्तीचे लवकरच नांदणी मठात पुनरागमन होईल असा विश्वास जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केला.
उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नांदणी येथील बाराशे वर्षाची परंपरा असलेल्या जैन मठातील हत्ती गुजरातच्या वनतारा मधील हत्ती पुनर्वसन केंद्रामध्ये नेल्यामुळे नांदणीसह पंचक्रोशीतील तमाम जनतेमध्ये निर्माण झालेला असंतोष वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून व विशेषता रविवारी झालेल्या अतिप्रचंड रॅलीमधून व्यक्त झाला.
समाजाच्या या भावनेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये अति परत आणण्यासंबंधीच्या करावयाच्या उपायोजनावर सविस्तर विचार विनिमय झाला. नांदणी येथे हत्तीच्या नियमानुसार व शास्त्रोक्त पद्धतीने रहिवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा राज्य सरकारतर्फे उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. सरकारचा हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने योग्य पद्धतीने व ठामपणे सर्वोच्च न्यायालयात मांडला जाईल यासाठीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधितांना दिले. यासंबंधीच्या सर्व प्रक्रियांचा विचार करून तातडीने या प्रक्रिया पूर्ण कराव्यात असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे व त्यांनी केलेल्या योग्य अशा मार्गदर्शनामुळे माधुरी हत्ती लवकरच नांदणी मठात परत येईल याची खात्री वाटत असल्याची प्रतिक्रिया जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली. व अत्यंत सकारात्मक आणि ठाम भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देशभरातील जैन समाजाच्या वतीने विशेष आभार व्यक्त केले.

Belgaum Varta Belgaum Varta