Sunday , December 7 2025
Breaking News

कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात रंकाळ्यावर होड्यांच्या शर्यतीने रंगला उत्साह

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव २०२५ च्या निमित्ताने रंकाळा तलावाच्या काठावर शनिवारी सायंकाळी पारंपरिक होड्यांच्या भव्य स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. जिल्हा प्रशासन कोल्हापूर आणि कृष्णाई वॉटर स्पोर्ट्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेने क्रीडाप्रेमींसह हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मंत्रमुग्ध केले. रंकाळ्याच्या नयनरम्य परिसरात झालेल्या या शर्यतीने कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा वारशाची झलक पुन्हा एकदा अधोरेखित केली.

स्पर्धेची सुरुवात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी झेंडा दाखवून केली. यावेळी सहनिबंधक मुद्रांक बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार करमणूक तेजस्विनी पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, नितीन धापसे आणि वर्षा नंदकुमार शिंदे उपस्थित होते. स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरणाचा समारंभही पार पडला. या स्पर्धेत एकूण नऊ होड्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २५,००० रुपये रोख, निशाण आणि चषक देऊन गौरवण्यात आले.

द्वितीय क्रमांक युवाशक्ती बोट क्लब कवठे सार यांनी मिळवला आणि त्यांना २१,००० रुपये, तर तृतीय क्रमांक डिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज यांना मिळाला, ज्यांना १५,००० रुपये बक्षीस मिळाले. चौथ्या क्रमांकाचे ११,००० रुपये सप्तर्षी बोट क्लब कवठेपिरान आणि पाचव्या क्रमांकाचे ९,००० रुपये न्यू शानदार बोट क्लब समडोळी यांना प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, सहभागी सर्व संघांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५,००० रुपये रोख, निशाण, चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेचे यशस्वी समन्वय वर्षा नंदकुमार शिंदे यांनी केले, तर पंच म्हणून दीपक हरगुडे, पांडुरंग पाटील, सचिन दगडे, महेश जामदार, धनंजय भिसे, ज्योतीराम जामदार, सौरव पाटील, प्रदीप तोरणे आणि शुभदा खोत यांनी जबाबदारी सांभाळली. बक्षीस वितरणातही स्थानिक व्यावसायिकांचा मोलाचा वाटा होता. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ट्वेंटी फोर कॅफे अँड क्रिमरी ताराबाई पार्क यांच्याकडून, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आनंद माने, माजी अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर यांच्याकडून, तृतीय क्रमांकाचे बक्षीस आस्वाद लस्सी भवानी मंडप, योगराज शिंदे ब्रदर्स सराफ व्यावसायिक आणि अभिजीत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मुक्तांगण असोसिएट्स यांच्याकडून, तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस रघुनाथ बागडी वाळवा आणि विजय नाईक यांच्याकडून देण्यात आले.

या स्पर्धेत जय मल्हार बोट क्लब कसबे डिग्रज, सप्तर्षी बोट क्लब ब कवठेपिरान, तरुण मराठा बोट क्लब ब सांगली वाडी आणि अचानक बोट क्लब समडोळी यांसारख्या होड्यांनी सहभाग घेतला. रंकाळ्याच्या काठावर लाटांशी झुंजणाऱ्या या होड्यांनी उपस्थित प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला. ही स्पर्धा केवळ क्रीडा सामना नसून, कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव ठरली.

About Belgaum Varta

Check Also

जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  एक महिन्याच्या विशेष जनजागृती मोहिमेसह थेट कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर : समाजात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *