Sunday , September 8 2024
Breaking News

फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार बहूजनांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात : प्रा. निरंजन फरांदे

Spread the love

 कोल्हापूर (जिमाका) :   फुले, शाहू, आंबेडकर यांना अपेक्षित असणारा आदर्श समाज घडवायचा असेल तर आज महिला तसेच युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून परिवर्तनाच्या चळवळीमध्ये सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचारच बहूजनांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात, असे प्रतिपादन सातारा येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्रा. निरंजन फरांदे यांनी केले.

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण कार्यालय, डी. के. शिंदे समाज कार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमामध्ये महात्मा फुले यांच्या जयंतीनिमीत्त व्याख्यान आयोजित केले होते त्यावेळी प्रा. निरंजन फरांदे बोलत होते.  सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. चंद्रकांत दळवी हे अध्यक्षस्थानी होते.

सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. दळवी म्हणाले, सायबर महाविद्यालयामधून फक्त पुस्तकी ज्ञान दिले जात नसून समाजामध्ये तळमळीने काम करणारे कार्यकर्तेही घडविले जातात. फुले, शाहू, आंबेडकर ही आपल्या देशाला मिळालेली देणगी असून त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे ही काळाची गरज आहे.

प्रास्ताविक सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले. श्री. लोंढे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दिनांक 6 ते 16 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये साजरा केला जात असून विविध कार्यक्रमांचे आयोजन विभागामार्फत केले असल्याची माहिती दिली. सर्व नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

सुनिल कांबळे यांनी मी महात्मा जोतीराव फुले बोलतोय या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले. यावेळी मच्छिंद्र कांबळे लिखीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य या पुस्तकाचे व हे क्रांतीसूर्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले तर आभार तालुका समन्वयक सुरेखा डवर यांनी मानले.

कार्यक्रमासाठी कार्यालय अधीक्षक सचिन पाटील, सहायक लेखाधिकारी अरविंद रंगापूरे, समाज कल्याण निरीक्षक प्रताप कांबळे, दत्तात्रय पाटील, सायबरचे डॉ. टी. व्ही. जी. सर्मा, डॉ. दिपक भोसले, डॉ. सुरेश आपटे, डॉ. दुर्गेश वळवी, तसेच समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी,  विजाभज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शासकीय निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शासकीय वसतिगृहांचे गृहपाल, समतादूत, सायबर महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

समरजित घाटगेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; 3 सप्टेंबर रोजी तुतारी फुंकणार

Spread the love  कोल्हापूर : फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आश्वासक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *