

कोल्हापूर : जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज किंवा अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. भारतीय पारंपरिक चर्मकलेचा वारसा जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी नामांकित जागतिक फॅशन ब्रँड प्राडा, तसेच लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे कोल्हापूरची “मेड इन कोल्हापूर” अशी आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होणार असून, जिल्ह्याच्या परंपरेचा सन्मान वाढणार आहे.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की, कोणतेही ब्रँड विक्रीसाठी असलेल्या उत्पादनांबाबत गोपनीयतेचे धोरण पाळतात. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल निर्मिती प्रक्रियेदरम्यान गोपनीयता जपणे अत्यावश्यक आहे. करारानुसार लवकरच कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध होणार असून, त्याआधी कोणत्याही प्रकारे दिशाभूल करणारी माहिती पसरवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पारंपरिक कौशल्य आणि प्राडाच्या आधुनिक डिझाइनचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदानाचा नवा टप्पा आहे. या भागीदारीमुळे कारागिरांना प्रशिक्षण, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी उपलब्ध होणार असून, त्यांच्या कलेला जागतिक मान्यता मिळणार आहे. 2019 मध्ये कोल्हापुरी चप्पलांना मिळालेल्या जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅगमुळे त्यांच्या अस्सलतेला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. आता या आंतरराष्ट्रीय सहकार्यातून कोल्हापुरी चप्पल जगभरात नव्या रूपात, नव्या ओळखीसह झळकणार आहेत, अशी अपेक्षाही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



Belgaum Varta Belgaum Varta