
कागल : येथील राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनात दुसर्या दिवशीही मोठी गर्दी झाली होती. एक कोटी रुपये किमतीचा महाकाय गजेंद्र रेडा, तर 5 लाखांचा खिलार खोंड यासह इतर जनावरेही या प्रदर्शनाचे आकर्षण ठरली होती. प्रदर्शनात 150 हून अधिक जनावरे सहभागी झाली आहेत.
प्रदर्शनात दीड टन वजनाचा एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा खास आकर्षण ठरला आहे. पाच वर्षे वयाच्या मुरा जातीच्या या रेड्याची उंची सहा फूट, तर लांबी दहा फूट आहे. कर्नाटकातील मंगसुळी येथील विलास नाईक यांच्या मालकीचा हा रेडा कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश येथे कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज 15 लिटर दूध, दोन किलो सफरचंद, दोन किलो सरकी पेंड असा त्याचा खुराक आहे.
काजळी खिलार जातीची अडीच वर्षांची पाडी सहा महिन्यांची गाभण आहे. चंद्रे (ता. राधानगरी) येथील बाबासो पाटील यांच्या मालकीची ही पाडी आहे. पंढरपूरच्या विठ्ठल बिचुकले यांच्या मालकीचा पंढरपुरी काजळी खिलार जातीचा पाच लाख रुपये किमतीचा खोंडसुद्धा प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सहा फूट उंची, दोन दाती, तीन वर्षांचा हा खिलार खोंड पैदाशीसाठी वापरला जातो. पिंपळगाव खुर्द येथील महेश आवटी यांच्या मालकीचा चार महिन्यांचा हरण्या नावाचा खोंड खुर्चीवर पुढील दोन पाय ठेवून उभा राहतो. अशी विविध प्रकारची जनावरे या प्रदर्शनात दाखल झाली आहेत. खाद्य पदार्थांचे स्टॉलही लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta