‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर (जिमाका) : शिवराज्यभिषेक हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करीत असून शिव विचारांचे आपण पाईक होऊया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील कागलकर हाऊस येथे उत्साही, मंगलमय वातावरणात तसेच पारंपरिक वाद्यांच्या व तुतारीच्या निनादात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात आली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच राज्याभिषेक दिन असून रयतेच्या राजाच्या विचारांचे पाईक होऊन शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करीत आहे. या दिनाचे महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी गतवर्षीपासून 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शिवविचार सामान्य जतनेपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ग्रामविकास विभागामार्फत अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे निर्णय घेण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील जनतेला स्वत:च्या हक्काचा निवारा मिळवून देण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षात राज्यात सुमारे 8 लाख घरे बांधली आहेत. हेरवाड गावाने घेतलेला विधवा प्रथा बंदीचा निर्णय राज्यातील ग्रामपंचायतीने घ्यावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे. तसेच मासिक पाळी जनजागृती व स्वच्छतेसाठी दारिद्य्ररेषेखालील महिलांना एक रुपयामध्ये सॅनिटरी पॅड देण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले.
‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी : पालकमंत्री सतेज पाटील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभषेक दिनानिमित्त संपूर्ण राज्यात आज ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात येत असून ही गुढी शिव विचारांचा वारसा पुढे नेणारी गुढी आहे, असे प्रतिपादन गृहराज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी याप्रसंगी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य शासनाची वाटचाल सुरु असून शिव विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शासनमार्फत यापुढेही अनेक उपक्रम राबविण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
जिल्हा परिषद आवार शिवमय
‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’उभारणी कार्यक्रमासाठी अधिकारी-कर्मचारी पारंपरिक वेषात आले आल्याने जिल्हा परिषद येथील कागलकर हाऊस परिसर शिवयम झाला होता. उत्साही, मंगलमय वातावरणात तसेच पारंपरिक वाद्यांच्या व तुतारीच्या निनादात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात शाहीर राजू राऊत यांनी शिवभूपाळी सादर केली तर सागर बगाडे यांच्या चमूने सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवजन्म ते शिवराज्याभिषेकापर्यंतच्या नाट्यछटा सादर केल्या.
तत्पूर्वी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या डेमो हाऊसचे आणि शिवसृष्टी या गडकिल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
Check Also
मतदान केंद्र येती घरा….
Spread the love कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघात गृहमतदानाला सुरुवात कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र …