कोल्हापूर (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे असून त्यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे. पुरोगामी विचारांचा हा वारसा यापुढे असाच चालत रहावा, यासाठी शाहू राजांचे कार्य आणि विचार भावी पिढी पर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या माध्यमातून शाहू महाराजांचे कार्य आणि विचार सर्वदूर पोहचतील, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज कोल्हापूर येथे व्यक्त केला.
न्यू पॅलेस येथे ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण गृहनिर्माण मंत्री श्री. आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. आव्हाड म्हणाले, थोर महापुरुषांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगातून अनमोल विचार समाजाला मिळतात. महापुरुषांचे आचार आणि विचार भावी पिढीसाठी मार्गदर्शक असल्याने या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. शाहू महाराजांचे विचार अनेक इतिहास संशोधकांनी त्यांच्या ग्रंथातून मांडले आहेत. आता हे विचार ‘शाहू छत्रपती’ या चित्रटपटाच्या माध्यमातून जगभर पोहचतील,असेही ते म्हणाले.
‘शाहू छत्रपती’ हा चित्रपटातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य आणि विचार सर्वांसमोर येईल, यासाठी हा चित्रपट भव्य-दिव्य व्हावा, अशी अपेक्षा श्रीमंत शाहू महाराज यांनी व्यक्त करुन चित्रपटास शुभेच्छा दिल्या.
श्री. पवार म्हणाले, थोर महापुरुष सामाजिक कार्य कर्तूत्वाने आपल्या हयातीमध्ये दंतकथा बनले आहेत. अशा महापुरुषांचे विचार चरित्र ग्रंथांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचे काम इतिहास संशोधकांनी केले आहे. ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे कार्यकर्तृत्व दिसावे अशा पद्धतीने चित्रपट व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. विनय काटे व वरुण सुखराज यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘शाहू छत्रपती’ हा चित्रपट मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी, तामीळ आणि तेलगू या सहा भाषेत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.