कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर हे बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या गळाला लागल्याने शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. आज शिवसैनिकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिवसैनिकांना रोखले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
पोलिसांनी शिवसैनिकांना रोखल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे पोलिस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत शिवसैनिकांना रोखले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी बंडखोर आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप केला. तुमच्या डोक्याला कोणी बंदूक लावली आहे का? अशीही विचारणा त्यांनी केली. फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर अधिकाधिक आमदार शिवसेनेत परत येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रकाश आबिटकर गद्दार असल्याचे फलक झळकावत शिवसैनिकांनी चांगलीच घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थही घोषणा देण्यात आल्या.
राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या कार्यालयावरही मोर्चा
अपक्ष आमदार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागरही शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा नेल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये चांगलाच राडा झाला होता.
Belgaum Varta Belgaum Varta