कोल्हापूर : जंगलात वन्य प्राण्यांची शिकार करून अवयवासह कातड्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी (दि.१) छडा लावला. बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या दोघांना पथकाने बेड्या ठोकून ६ लाख रुपये किमतीचे कातडे हस्तगत केले. बाजीराव श्रीपती यादव ( वय ३९, रा. सोनुले, ता. भुदरगड) आणि ब्रह्मदेव शशिकांत पाटील (वय ३२, रा. किटवडे, ता. आजरा )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोल्हापूर गारगोटी रस्त्यावरील दिंडनेर्ली फाट्याजवळ सापळा रचून ही कारवाई केली, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोरले यांनी दिली.
जंगलात वन्य प्राण्यांची बेकायदा शिकार करून शरीरातील महत्त्वाचे अवयव आणि अंगावरील कातडीची कोल्हापूरसह सीमाभागात खुलेआम तस्करी होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. या तस्करीत शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, आजरा तसेच करवीर तालुक्यातील काही संशयित सक्रिय असल्याची माहिती होती. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी वन्य प्राण्यांची शिकार आणि अवयवासह कातड्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार हवालदार संभाजी भोसले, राजीव शिंदे, खंडेराव कोळी यांचा समावेश असलेले पथक नियुक्त केले होते.
बाजीराव यादव आणि साथीदार ब्रह्मदेव पाटील हे दोघे बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी दिंडनेर्ली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून ६ लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे हस्तगत केले. बिबट्याची शिकार कोणी व कोठे तसेच किती दिवसांपूर्वी केली? याची सखोल माहिती संशयितांकडून घेण्यात येत असल्याचे तपास अधिकारी गोरले यांनी सांगितले. खुद्द बिबट्याचे कातडे पोलिसांनी हस्तगत केल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. अलीकडच्या काळातील ही मोठी कारवाई असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Check Also
महामेळाव्यास परवानगी नाकारली तर कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना महाराष्ट्र सीमेवर अडवू
Spread the love शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा कोल्हापूर : बेळगाव येथे ९ डिसेंबर …