कोवाड : जिल्ह्यातील लॉकडाउन रविवारी रात्री शिथील झाल्याने कोवाड बाजारपेठेत सोमवारपासून पुन्हा गर्दी उसळली आहे. लॉकडाउन काळात बंद असणारी दुकानेही खुली होत असल्याने लोकांची गर्दी होत आहे. ग्रामपंचायतीकडून नियमांचा भंग करणार्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी बाजारपेठेत होणारी गर्दी चिंताजनक झाली आहे. प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. सकाळच्या सत्रात बँकांच्या दरवाजात होणारी गर्दी धडकी भरणारी आहे.
सकाळ आठपासून बाजारपेठेतील सर्वच मार्गावर वाहनधारकांसह पादचार्यांची वर्दळ वाढलेली दिसून आली. कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी शासन लॉकडाउनसह वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिक घरी थांबताना दिसत नाहीत. काळजी घेणारे घेत आहेत. मात्र संसर्गाकडे दुर्लक्ष करणारे मुक्तसंचार करीत आहेत. पोलिसांकडूनच्याही जुजबी कारवाईची लोकांना सवय झाल्याचे दिसते. पोलिसांनी कठोर कारवाई केली असती तर मास्क न घालता विनाकारण फिरणार्यांना चाप बसला असता. यापूर्वी पोलिसांनी कांही वाहने जप्त केली आहेत. दंडात्मक कारवाईही केली आहे. पण कठोर कारवाई नसल्याने अनेकांचे फावले आहे. कोवाड बाजारपेठेतील लोकांच्या गर्दीचे चित्र पाहिले तर कोरोनाची साखळी कशी तुटणार असा प्रश्न पडतो. बाजारपेठेतून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जावे लागते. त्यामुळे दिवसभर परिसरातील अनेक लोक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी, लसीकरण व उपचारासाठी ये-जा करत असतात. अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली अनेकजन विनाकारण फिरताना दिसतात. त्यामुळे तलाठी दिपक कांबळे, ग्रामसेवक जी. एल. पाटील, उपसरपंच पुंडलिक जाधव, सदस्य रामा जाधव, रामचंद्र व्हन्याळकर, दिपक वांद्रे, चंद्रकांत सुतार, परशराम जाधव, मारुती नाईक ही मंडळी गर्दी कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशिल आहेत. बाजारपेठेतील बैठ्या व्यापार्यांचे सुरक्षित ठिकाणी नियोजन करण्याचे काम करत आहेत तसेच सकाळी 11 वाजलेनंतर दुकान बंद करण्यासाठी दुकानासमोर जावून आवाहन करत आहेत. पण कांहीजन त्याला न जुमानता चोरीच्या मार्गाने व्यवसाय सुरु ठेवले आहेत. त्यामुळेच लोकांची गर्दी होत आहे तसेच बँकाच्यासमोर तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे बँकानी दरवाजे बंद करुन ग्राहकाना सेवा देण्याचे काम सुरु ठेवले आहे. प्रशासनाने तात्काळ गर्दीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे.
