
एका शांत संध्याकाळी मी जेवणाचे पान वाढत असताना आमच्या सोसायटीतला एक लहानसा गोड मुलगा रघुवीर त्याची खेळण्यातली बैलगाडी घेऊन लांबून त्या घर्रर…घर्रर आवाजात आमच्या घराच्या दिशेला येऊ लागला, आमचे दार वाजवू लागला. त्याचे पालकही त्याच्या पाठी उभे. मी आश्चर्याने त्यांना पाहत जरावेळ तसेच उभे राहीले. पण पोळा सणाच्या शुभेच्छा देणारे ते कुटुंब दारी उभे पाहूनच आम्ही हर्षावलो. त्याच्या खेळण्यातल्या बैलगाडीला टिळा लावून लहानश्या रघुवीरच्या हातात गोड खाऊ देऊन त्याचे कौतुक केले. मुलाला प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही आभार मानले.
मला आठवतंय तीन वर्षांच्या देवश्रीला घेऊन जेव्हा आम्ही सुरतहून मुंबईत आलोत तेव्हा तिच्यासाठी लहान मुलांचे विशेष मराठी बालगीते लावून द्यायचे. त्यात सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय..? हे आमचे आवडते गाणे.
एका सकाळी पोळा सणाच्या सुमारास खराखुरा बैल हार घालून सजलेला, गळ्यातला घंटा, पायातले घुंगरू वाजवत आमच्या फ्लॅट पाशी आला तेव्हा त्या भोलानाथाला आम्ही माय लेकीने खिडकीतून अचंबितहून पाहिला. लहान मुलं व पालक गम्मत म्हणून त्या भोलानाथाला काही प्रश्न विचारायचे तो मान हलवून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे हो की नाही मधे द्यायचा. उत्तर मिळाल्यावर लोक त्याची पूजा करायचे. पुरणपोळी, लाडू, गुळधान्याचा चारा खाऊ घालायचे. शेतात पेरणीचे काम करणारे, मातीशी नाळ जुळलेले हे प्राणी प्रकृतीची हालचालही सांगू शकायचे आणि म्हणूनच शेतकऱ्यांचे खरे संगाथी म्हणून ओळखले जायचे.
आपल्या सर्वांना हे माहित आहे की देवाचा देव महादेव, पार्वती, गणेश यांच्या सोबत नंदीबैलाचेही स्थान विशेष आहे.
रघुवीर आणि त्याच्या कुटुंबीयांमुळे बेंगळूरू सारख्या आयटी शहरात पोळा हा सण काही जणांना नव्याने समजला. अमराठी राज्यात मराठी संस्कृती जपणारी लोक आहेत हेही जाणवलं. पुढच्या वर्षी रघुवीर सोबत अजून काही मुलांना जोडूयात हा मनोमनी विचार आला. मुलांना आज जरी याची गम्मत वाटेल तरी पुढे केलेली कृती नक्कीच स्मरणात राहील आणि विचारांती त्याचे महत्व देखील कळेल.
माझ्या लहानपणी कडी, गुजरातयेथे माझी आजी पोळा सणाची तयारी करायची. स्वतः मातीचे बैल बनवायची, मलाही त्यात गुंतवायची. आई त्या बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायची. बैलांना टिळा लावून लहानसा हार घालून आम्ही नमस्कार करायचोत.
आज जरी बैल पहायला मिळत नसतील तरी त्याच्या प्रतिरूपाची पूजा करून त्यांना कृतज्ञतापूर्वक नमन करून समाधान मानून घ्यावे लागते. अलीकडे जरी मशीन आले असले तरी आपल्याला मिळालेली जनावरांची साथ, मैत्रीचे नाते आपण अबाधित ठेवले पाहिजेत.
पोळा सणाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐
©®दिपाली महेश वझे, बेंगळूरू

Belgaum Varta Belgaum Varta