Saturday , September 21 2024
Breaking News

मविआची ऑफर नाकारत भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम; सूत्रांची माहिती

Spread the love

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र, भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. मात्र, भाजपने ही विनंती अमान्य केली असून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मविआची भाजपला ऑफर काय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने भाजपला ऑफर दिली आहे. भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्याची परतफेड विधान परिषद निवडणुकीत केली जाईल. त्यानुसार, विधान परिषद निवडणुकीत मविआकडून भाजपला आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपचे चार उमेदवार विधान परिषेदत विजयी होऊ शकतात. तर, मविआने भाजपला राज्यसभेच्या बदल्यात आणखी एक जागा देण्याची ऑफर दिली आहे.
संख्याबळानुसार काय स्थिती?
विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार, भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अतिरिक्त मते आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणार्‍या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहावी जागा जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर, भाजपलादेखील सहावी जागा जिंकण्यासाठी 13 च्या आसपास मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यास ती अटीतटींची होणार असल्याचे म्हटले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Spread the love  सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *