Friday , November 22 2024
Breaking News

देवेंद्र फडणवीस मॅच्युअर्ड नेते : भाजप-मविआच्या बैठकीनंतर संजय राऊतांचा सूर बदलला

Spread the love

मुंबई : राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पडद्यामागे सुरु असलेल्या हालचालींना आता यश येताना दिसत आहे. काहीवेळापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ’सागर’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या बैठकीला काँग्रेस नेते सुनील केदार, अनिल देसाई, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यायची तयारी दर्शविली का, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, ही बैठक आटोपल्यानंतर काहीवेळातच मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना सूर बदललेला दिसला. त्यामुळे भाजपचे नेते धनंजय महाडिक राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणार का, हे आता पाहावे लागेल.
संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत भाष्य करताना म्हटले की, ही निवडणूक बिनविरोध झाली तर चांगले होईल. देवेंद्र फडणवीस हे मॅच्युअर्ड नेते आहेत. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. मात्र, आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यसभा निवडणुकीबाबत काही मार्ग निघाला तर त्याचे स्वागत आहे. कारण या निवडणुकीनिमित्ताने महाराष्ट्रातील वातावरण आणखी बिघडू शकते. या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. मतांसाठी आमदारांना आमदारांना कोण पैशांचे प्रलोभन दाखवत आहे, कोट्यवधींचे आकडे समोर येत आहेत. हा एकप्रकारचा आर्थिक गैरव्यवहारच आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी या सगळ्याची चौकशी केली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यामुळे मविआ नेते आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. देवेंद्र फडणवीस मविआच्या विनंतीला मान देऊन धनंजय महाडिक यांना माघार घ्यायला लावणार का, हेदेखील पाहावे लागेल. आज दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यसभा निवडणुकीचे अर्ज माघारी घेता येऊ शकतात. त्यामुळे येत्या काही तासांमध्येच राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे स्पष्ट होईल.

About Belgaum Varta

Check Also

भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *