Saturday , September 21 2024
Breaking News

एकही शिवसैनिक गद्दार नाही, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीची चिंता नाही : उद्धव ठाकरे

Spread the love

मुंबई : सोमवारी अर्थात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी उद्याच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतल्या वेस्टइन हॉटेलमध्ये पाचारण केलं आहे. या सर्व आमदारांशी आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी आमदारांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद निवडणुकीची अजिबात चिंता वाटत नसल्याचं सांगितलं. तसेच, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांचा उल्लेख करत त्यांचं कौतुक देखील केलं.

“…यालाच लोकशाही म्हणतात”

“उद्याच्या निवडणुकीसाठी मी मार्गदर्शन करण्याची गरज नाही. आमदारांची बडदास्त निवडणुकीसाठी ठेवावी लागते. तशी ती ठेवली आहे यालाच लोकशाही म्हणतात. आपलेच आमदार, खासदार, नगरसेवक यांना एकत्र ठेवणं ही आजची लोकशाही आहे. उद्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या नंतर हे अजून मोठं चित्र दिसलं पाहिजे. एवढ्या संख्येनं मला आमदार दिसले पाहिजेत. सभांमधून बरंचसं बोलून झालंय. अजूनही बोलण्यासारखं खूप आहे. पण तुमच्यासोबत हा एक दिवस साजरा करावा, असं ठरवलं”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ आठवण

“आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवलं आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको”, अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.
“मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. मी चिंता करत बसलो, तर शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलंय त्याचा उपयोग काय? हारजीत होतच असते. उद्या तर जिंकणारच आहोत. त्याची चिंता नाही. राज्यसभेच्या निवडणुकीत आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोणतं? तोही अंदाज लागला आहे. हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल. मला फाटाफुटीची शक्यता अजिबात वाटत नाही. आता शिवसेनेत असा गद्दार मनाचा कुणी अजिबात राहिलेला नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Spread the love  सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *