नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याचे म्हटले आहे. या निवडणुका जर बिनविरोध झाल्यास राज्यावर मोठे उपकार होतील, असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
राऊत पुढे म्हणाले, राज्यात सरकार पाडण्यासाठी जोरदार चर्चा सुरू आहेत. हे सरकार पाडण्यासाठी रणगाडे, तोफगोळे जरी घेऊन आला तरी काहीही फरक पडणार नाही. हे सरकार पाच वर्षे चालेल. दरम्यान काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदावर दावा केला असून, ही अध्यक्षपदाची निवडणूक ६ जुलैला होणार आहे. तर विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यातील नेते निर्णय घेतील असेही राऊत म्हणाले.
याचबरोबर जरंडेश्वर कारखान्यावर जी कारवाई झाली ती सुडबुद्धीतून करण्यात आली आहे. सत्तेतल्या नेत्यांवर कोंडी करण्याचे ईडीच्या माध्यमातून काम सुरू आहे. सरकार पाडणे किंवा सरकार स्थापन करणे हे ईडीच्या कार्यालयाचे काम नाही, याचबरोबर काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष होईल का यावर संजय राऊत म्हणाले, हा अधिकार शिवसेनेला नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करतील. शरद पवार, सोनिया गांधी आणि शिवसेना मिळून याबाबत योग्य निर्णय घेतील असे राऊत म्हणाले.