मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दमदार बंड उभारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुढचे लक्ष्य ‘शिवसेना भवन’ वर ताबा करण्याचे असेल, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वतःचीच शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. दोन तृतीयांश आमदारांना गटात खेचण्यात यश आलेल्या शिंदे यांनी आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यातच विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी स्वतःची निवड करताना आता शिवसेनेच्या राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीतदेखील मोठी फूट पाडण्याची यशस्वी रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. आजच एकनाथ शिंदे याची शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड करण्यात आली असून त्यांनी स्वतःच्या गटाचे नेते, उपनेते आणि प्रवक्ते पदाच्या नेमणुका केल्या आहेत.
तर ज्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून हकालपट्टी करण्यात आली, त्यांना शिंदे यांनी पुन्हा जिल्हाप्रमुख म्हणून नेमले आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये शिंदे यांनी दोन तृतीयांश फूट पाडली तर संपूर्ण पक्षाचा ताबा, कार्यालये आणि नेमणुकांचे अधिकार घेण्यात शिंदे यांना अडथळा येणार नाही असे जाणकारांचे मत आहे. तूर्तास शिंदे यांना पदाधिकाऱ्यांना नेते, उपनेते पदावर नेमण्याचा अधिकार नसला तरी तसे घडताना दिसत असून अखेरचा पर्याय म्हणून ‘शिवसेना भवन’ वर दावा करून पक्षाचे मुख्यालय ताब्यात घेण्याचा ते प्रयत्न करतील, असे राजकीय आडाखे बांधले जात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta