मुंबई : शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. त्या सर्व आरोपांचं संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना खंडन केलं आहे. ब्ल्यूसी हॉटेलमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. 2019 मध्ये भाजपनं शब्द पाळलेला नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच, शिंदे गटाला मान्यता मिळाल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली आहे. आमच्या पत्राला उत्तर नाही, मात्र फुटीर गटाला मान्यता दिली जाते, असं ते म्हणाले. तसेच, शिंदे गटाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दाव्यांवर बोलताना बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलं असाही दावा ते करु शकतात, असाही खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
संजय राऊतांनी शिंदे गटावर हल्ला चढवला आहे. फुटीर गट सध्या चंद्रावरही कार्यालय सुरु करु शकतो, एवढा हवेत आहे, असं राऊत म्हणाले. त्यांना शिवसेना भवनाचा ताबा हवाय, त्यांना मातोश्रीचा ताबा हवाय, त्यांना सामनाचा ताबा हवाय. अशा पद्धतीनं एक दिवसे ते जो बायडन यांचं घरंही ताब्यात घेतली. बाळासाहेब ठाकरे यांचा मूळ पक्ष हा आमचाच आहे. किंबहुना बाळासाहेब ठाकरेंना आम्हीच पक्षात आणलंय, असंही सांगायला ते कमी करणार नाही. उद्धव ठाकरेंना आम्हीच पक्षप्रमुख केलं. काहीही होऊ शकतं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
तपास यंत्रणांचा आदर करणं माझं कर्तव्य
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, “यासर्व राजकीय वातावरणात, घडामोडींमध्ये नक्कीच मला असं समन्स येईल, अशी अपेक्षा महाराष्ट्राला आणि देशाला होती. मलाही होतीच, त्यानुसार ते समन्स मला आलेलं आहे. ते मी पाहिलेलं नाही कारण मी दिल्लीत आहे. या घडामोडींमध्ये मी व्यस्त आहे आणि व्यस्तच राहीन. सध्या अधिवेशन सुरु आहे, त्यामुळे अधिवेशनानंतरची तारीख द्यावी, अशी आमचे वकील विनंती करतील. जेव्हा जेव्हा मला अशाप्रकराचं समन्स आलेलं आहे, तेव्हा मी देशाचा एक नागरिक, खासदार म्हणून मी त्या तपास यंत्रणांचा आदर करणं माझं कर्तव्य समजतो. जरी मला आणि लोकांना वाटत असेल हे चुकीचं आहे. हे राजकीय दबावापोटी होतंय किंवा या राजकीय घडामोडींचा बाग म्हणून होतंय, तरीही मी या यंत्रणांपुढे त्यांना जीजी माहिती हवी असते, ती देण्यासाठी त्यांच्या चौकशीला सामोरं जाईन.”
आमच्या पत्राला साधं उत्तर नाही अन् फुटीरगटाला मान्यता
लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांना शिवसेनेतील गटनेते म्हणून मान्यता दिली. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “ठिक आहे, त्यावर तांत्रिक आणि कायदेशीर लढाई सुरु राहिल. फारच घाई असते अशावेळी. इतर वेळी निर्णय होत नाहीत. पण एखादा पक्ष आपल्या विरोधातील फुटतोय किंवा फोडला गेलाय, या आनंदापोटी निर्णय घेतले जातात. आम्ही दिलेल्या पत्रावर कोणतीच कारवाई होत नाही. साधं उत्तरंही दिलं जात नाही आणि फुटीरगटाला मान्यता दिली जाते. यावरुनच लोकसभेचं कामकाज कोणत्या पातळीवर सुरु आहे, हे तुम्हाला कळालंच असेल.”
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून आम्हाला न्याय मिळेल, याची आम्हाला खात्री
शिवसेना नेमकील कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, सुनावणीकडे आमचं लक्ष आहे. आज निर्णय येण्याची शक्यता मला वाटत नाही. आम्हाला वाटतंय की, सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल. लोकशाही जीवंत आहे आणि लोकशाहीची इतक्या जिवंतपणे हत्या कोणी करु शकणार नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून आम्हाला न्याय मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. कारण ज्या पद्धतीनं कायदा आणि घटनेची पायमल्ली करुन फुटीर गटाला मान्यता देण्याचा प्रयत्न सुरु आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे जे नियम आहेत, त्यांचं पालन केलं जात नाही. म्हणूनच आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली.”