मुंबई : : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्व आमदार डोळे लावून बसले आहेत. हा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्याच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौर्यावर आहेत. या दौर्यात ते अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यात विस्ताराचा मुहूर्त ठरू शकतो.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास 22 दिवस झाले तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण जनतेचं मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष आहे. मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली होईल.
भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे
शिंदे गटाकडून
गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार यांना संधी मिळू शकते.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु तीन आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय. आता ही दिल्लीवारी झाल्यानंतर तरी मंत्रिमंडळ विस्तार होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे.