मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील ’मैत्री’ बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये देखील ईडीचं पथक दाखल झाले आहे. त्याशिवाय, मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
शिवसेनेचे फायरब्रँड नेते, प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची गेल्या 5 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या सात अधिकार्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रं आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. तिकडे ईडीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक होणार का याकडं लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta