मुंबई : शिंदे सरकारमध्ये सर्वाधिक मलाईदार खाते भाजपने आपल्याकडे ठेवला आहे. आता भाजपने विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी हालचाल सुरू केली आहे. मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या माजी मंत्री राम शिंदे यांची वर्णी सभापतीपदी लागणार अशी चर्चा रंगली आहे. तसेच, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही नव्याने सादर केली जाणार आहे.
उद्या बुधवारपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. शिंदे सरकारचे हे पहिले पावसाळी अधिवेशन आहे. आता विधान परिषदेचा सभापती बसवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानपरिषदेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या सभागृहाच्या सभापती पदावर आपल्या पक्षाचा नेता बसावा, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत.
सभागृहाच्या कामकाजावरील पकड घट्ट करण्यासाठी सभापतिपद मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पदासाठी विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळते आहे.
सद्यस्थितीत विधानपरिषदेत भाजपकडे 24, तर शिवसेनेकडे 11 आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 10 जागा आहेत. तसंच 16 जागा रिक्त आहेत. यामध्ये राज्यपाल नियुक्त 12 जागांचाही समावेश आहे. विधान परिषदेचा सभापती निवडण्यापूर्वी या जागांची नियुक्ती झाल्यास भाजपचे संख्याबळ महाविकास आघाडी पेक्षा जास्त होतं आणि भाजपला विधान परिषदेतही बहुमत सिद्ध करता येईल.