मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली भूमिका अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी दाखवून दिली.
स्थगिती सरकार हाय हाय… महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी… आले रे आले गद्दार आले.. अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडल्याचे आज सकाळीच पाहायला मिळाले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने सरकारला धारेवर धरण्यात आले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, ईडी सरकारविरोधात आक्रमकपणे लढणार असल्याचेही स्पष्टपणे सांगितले.
धनंजय मुंडेंच्या घोषणा लक्षवेधी
विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. यावेळी सत्ताधारी पक्षातील सुधीर मुनगंटीवार विधानभवनात जात असताना धनंजय मुंडे यांनी “सुधीरभाऊंना कमी दर्जाचं खातं देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, अशी घोषणाबाजी केली आणि विरोधीपक्षातील सर्व आमदारांनीही पाठिंबा देत सत्ताधाऱ्यांना डिवचलं. इतकंच नव्हे, तर शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट दिसताच धनंजय मुंडे यांनी संजय शिरसाट यांना मंत्रीमंडळात स्थान न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी केली. तर आशिष शेलार येताच शेलारांना मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta