मुंबई : दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर जोरदार आरोप झाले. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला आहे. राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलनं केली. परंतु अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच आरोप झाल्यानंतर क्लिनचिट देण्याचं काम करणार का हा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
शिंदेची वृत्ती घाणेरडी असून आरएसएसने काळजी घ्यावी
मिंदे गट काल शिवसेना कार्यालयात गेले होते. आज आरएसएस कार्यालयात गेले. आरएसएस कार्यालयात देखील तिथेही ते ताबा सांगायला गेले होते का? सध्या दुसऱ्यांचे मंत्री, पक्ष आणि कार्यालय चोरण्याचा महाराष्ट्रात प्रकार सुरू आहे. हा प्रकार पाहून महाराष्ट्रात टोळीचे राज्य आले का अशी भावना जनमानसात आहे. शिंदेची वृत्ती घाणेरडी असून आरएसएसने काळजी घ्यावी. भागवतांनी देखील कार्यालयात कुठे लिंबू टाकलं का पाहावे, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला दिला आहे.
मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव
महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमाप्रश्नाचा ठराव झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावात सुरु असलेल्या कर्नाटक विधिमंडळात उमटले. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. एस. अश्वथ नारायण यांनी केली. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी ही भाजप नेत्यांनी केली आहे. मुंबई केंद्रशासित करणे हा भाजपचा डाव आहे. मुंबई भाजपच्या हातात गेली तर घात कसा करणार हे समोर आले आहे. मुंबई आजपर्यंत कोणामुळे सुरक्षित आहे हे मुंबईकरांना माहित आहे.