मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर काँग्रेसचा अंतर्गत कलह मोठ्या वळणावर येऊन पोहोचलाय. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा सादर करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील काँग्रेस सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक पदवीधर निकालाच्या दिवशी नाराजी व्यक्त करतानाच राजीनामा दिल्याचीही माहिती मिळत आहे. आता दिल्ली हायकमांड याबाबत काय निर्णय घेणार? थोरातांचं मन वळवणार की, नवा बदल घडवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केंद्रीय नेतृत्व बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. पण बाळासाहेब थोरात मात्र आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच, राजीनाम्याच्या पत्रात थोरातांनी आपण काँग्रेसच्याच विचारांनी पुढे जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात केलं आहे.