मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतरचा पहिलावहिला अर्थसंकल्प गुरुवारी मांडला जाणार आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस नव्या सरकारच्या काळातील पहिलाच अर्थसंकल्प आज सादर करतील. दुपारी दोन वाजता अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात होईल. यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक महत्त्वाचा पेच उभा राहिला आहे. राज्यातील सध्याच्या मंत्रिमंडळाच्या रचनेमुळे हा पेच निर्माण झाला आहे. विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्र्याकडून अर्थसंकल्प मांडला जातो. परंतु, सध्या राज्यात अर्थ राज्यमंत्री पदावर कोणीच नाही. त्यामुळे आज दुपारी विधानपरिषदेत कोण अर्थसंकल्प मांडणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. सध्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी दीपक केसरकर किंवा शंभूराज देसाई यापैकी एकाला प्राधिकृत केले जाऊ शकते. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार असल्याचे सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta