मुंबई : रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीनं ताब्यात घेतलं आहे. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचं पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे.
उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं असून ईडीचं पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झालं आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्यानं आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचंही नाव जोडण्यात आलं होतं. याप्रकरणी विनायक राऊतांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची खेडमध्ये झालेली सभा यशस्वी होण्यामागे सदानंद कदम यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच सुडबुद्धीनं ही कारवाई केल्याचं विनायक राऊतांनी म्हटलं आहे.
कदमांवर राजकीय सूडबुद्धीनं कारवाई : संजय कदम
सदानंद कदम यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईचा ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सदानंद कदम यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीनं केली जात असल्याचा संजय कदमांचा आरोप आहे.