नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे.
गुजरातमधील सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’शी संबंधित केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यातच शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.
संसद सदस्यत्व रद्द
लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांचा अपात्रतेचा आदेश 23 मार्चपासून लागू होईल. अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांना (राहुल गांधी) संविधानाच्या कलम 102 (1) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 अंतर्गत अपात्र ठरवण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta