नवी दिल्ली : राज्यात शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
भाजप नेते पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. पंकजा मुंडे दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.
काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांसोबत पक्ष प्रवेशाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
पंकजा मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं सोशल मीडियावर दिसत होतं. त्यामुळे आता ह्या चर्चा जास्त जोर धरु लागल्या आहेत. शिवाय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं राजकीय वैर तर सर्वांनाच ज्ञात आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
सध्या पंकजा मुंडे सध्या महासचिव आहेत. आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत मात्र अजून त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा प्रतिक्रिया दिली नाही.