पुणे (लक्ष्मण राजे) : दिनांक २४ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता चरोल्ही येथील प्राईड वर्ल्ड सिटी संकुलातील किंग्जबरी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील दालनात “फ्रेंड्स फॉर एव्हर महिला ग्रुप”च्या वतीने “भजनानंद” शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय सौ.ललिता राजे आणि प्रमुख पाहुण्या सौ. सुनिता डेंगरे यांच्या हस्ते “भजनानंद” शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमातील अध्यक्षीय भाषणात सौ. ललिता राजे यांनी “भजनानंद” महिला भजन मडंळाचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख पाहुण्या सौ. सुनिता डेंगरे यांनी अल्पावधीत यश संपादन करणाऱ्या फ्रेंड्स फॉर एव्हर महिला ग्रुपचे अभिनंदन केले. तसेच फ्रेंड्स फॉर एव्हर महिला ग्रुपच्या अंतर्गत “योगाभ्यास” शाखा विस्तारित करण्यात आली. याप्रसंगी फ्रेंड्स फॉर एव्हर महिला ग्रुपच्या अध्यक्षा मंजुषा परेतकर यांनी मनोगत व्यक्त करताना “भजनानंद” आणि “योगाभ्यास” शाखेच्या संकल्पनेची उपस्थित असलेल्या महिला सदस्यांना माहिती दिली. या विशेष कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ. सुनंदा सूर्यवंशी, प्रतिभा उपासनी यांनी केले. या कार्यक्रमात सोसायटीतील सर्व महिलांनी हिरीरीने भाग घेतला. तसेच “भजनानंद” शाखेच्या उद्घाटनानंतर महिलांनी एका पेक्षा एक सूरस भक्तिगीते सादर करून मोठ्याप्रमाणात उपस्थित असलेल्या महिला रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळवली. सौ.संध्या टोपरे यांच्या मार्गदर्शनाखाली “योगाभ्यास” शाखेचा विस्तार करण्यात आला. सर्व ज्येष्ठ नागरिक महिला सभासदांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. शेवटी सौ.सुनंदा सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन केले.
त्यानंतर आरती करण्यात आली. सर्व उपस्थित महिलांना प्रसाद वितरण केल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्व महिलांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले.
