ठाणे : नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेतले आहे. पार्टीत गांजा, चरस ही अमली पदार्थ जप्त करण्यात आली आहेत.
घोडबंदर येथील कासारवडवली भागात रेव्ह पार्टी आयोजित केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मध्यरात्री युनिट पाचचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पार्टी सुरू झाल्यानंतर पथकाने येथे धाड टाकली. त्यांनी सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेऊन अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कासारवडवली पोलीस ठाण्यात सुरू आहे.