जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना परिसरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. प्रकृती अस्वास्थामुळे जरांगेंवर उपचार सुरु आहेत. पण त्यांनी अम्ब्युलन्समधून येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षण विरोधकांना पाडा, असं आवाहन केलं. आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल असं मनोज जरांगे म्हणाले.
आरक्षण विरोधकाला असा पाडा, पाच पिढ्या उभ्या राहायला नको : मनोज जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, आपला उमेदवार नसल्यामुळे, तुम्ही मतदान कोणालाही करा, पण जे सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल त्याला करा. इतक्या ताकदीने विरोधकाला पाडा की कमीत कमी पाच पिढ्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नसल्या पाहिजेत. मराठ्यांनी एकजूट दाखवा. 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत जिथे मराठ्यांचं वर्चस्व आहे. माझा राजकीय मार्ग नाही, मला तिकडे जायचं नाहीय, पण मला तुम्ही तिकडे न्यायचा प्रयत्न करताय तर माझा नाईलाज आहे. मराठा समाजासह लिंगायत समाज सर्व एकत्र येऊ. प्रश्न गोरगरिबांचा आहे, आम्हाला देणारे बनावे लागेल.