“प्रज्ज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत, असं मोदींनी जाहीर सभेत सांगितले. मग त्यांनी केलेले गुन्हे तुमच्या माथी मारायचे की नाही? मारले पाहिजेत ना? तो रेवण्णा आज फरार झालेला आहे. इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही रात्री अपरात्री पोलीस पाठवता. अजूनही दमदाटी सुरु आहे. मिंध्याकडे जा किंवा तुरुंगात जा म्हणतात”, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ धुळ्यात सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, अरे 4 जून पर्यंत थांबा. 5 जून उजाडेल, तेव्हा दिल्लीत आमचं सरकार आलेलं असेल. तेव्हा तुमच्या बिळातून बाहेर काढून तुमच्या शेपट्या लटकवणार आहोत. तो प्रज्ज्वल रेवण्णा आज पळून गेलेला आहे. आपलं सरकार आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा कोठे जरी असला तरी खेचत आणून मोदीजी त्याची जबाबदारी तुमच्या गळ्यात बांधणार आहोत.
गेल्या वेळी यांच्यासाठी मतं मागितली, याची लाज वाटते
भाजपवरती आई-वडिलांनी संस्कार केले आहेत की नाही, असा प्रश्न देशाला पडलाय. वेडवाकडं काहीही बोलत आहेत. खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. गेल्या वेळी यांच्यासाठी मतं मागितली, याची लाज वाटते. 2014 साली मोदीजी म्हणाले होते की, मनमोहन सिंगची रेनकोट घालून अंघोळ करतात. हे कधी पाहायला गेले होते. असं चोरून पाहाण्याची सवय त्यांची जुनी आहे. पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले. तुम्ही कोठून आलात, त्या मातीचे संस्कार आम्हाला माहिती नाहीत. पण आमच्या शिवछत्रपतींची आणि जिजाऊंची महाराष्ट्राची माती आहे, या मातीत आमच्या मुलांना आम्ही असे संस्कार करत नाहीत, अशी टीकाही ठाकरेंनी केली.