मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापूर्वी माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली तसंच सरकारला त्यांनी मुदत दिली आहे. मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आंतरवली सराटीला गेले. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नेते जातीवाद करायचा नाही म्हणतात आणि…
“नेते जातीवाद करायचा म्हणतात, कॅमेरासमोर गोड बोलतात. पण प्रत्यक्षात कृती काहीही होत नाही. तरीही आम्ही मराठा बांधवांना शांत राहण्यास सांगितलं आहे. कोण काय कावे करतं आहे त्यावर बारीक लक्ष ठेवा आणि नंतर तुमची भूमिका मांडा. ४ जूनला आमरण उपोषण सुरु होणार आहे. आपल्याला यां नेत्यांमध्ये कोण जिंकलं? कुणाच्या अंगावर गुलाल पडला याचा आनंद नाही. तर आरक्षणाच्या गुलालात आपल्याला रस आहे.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
मराठा समाज शांत आहे पण लक्षपूर्वक सगळं पाहतो आहे
“जे कुणी मुद्दाम डिवचत आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जातीय तेढ नेत्यांना निर्माण करायची आहे मराठा समाजाला नाही. मात्र मी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे आणि मराठा समाज शांत आहे. एकीकडे नेते आम्हाला सांगतात की जातीयवाद करु नका. पण जातीयवाद न करण्याची जबाबदारी एकट्या मराठा समाजाची नाही. जर सरकारने ऐकलं नाही तर मराठा समाजाला सत्तेत घुसावं लागेल. सत्ता काबीज करावी लागेल मग सगळ्या गोष्टी आपोआप होतील असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. काही नेत्यांना जातीयवाद दूर करायचाच नाही. आवाहनही करत नाहीत की कुणी जातीयवाद करु नका” असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.
६ जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा..
४ जूनला आम्ही उपोषण करणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हे उपोषण करणार आहोत. ४ जूनला आंतरवली सराटीतून आम्ही उपोषण सुरु करणार आहोत. आम्हाला कोण पडलं, कोण निवडून आलं याचा आम्हाला आनंद नाही. आरक्षणाचा गुलाल आमच्यासाठी आमचा आनंद आहे. आम्हाला बाकी कशात आनंद नाही. ४ जूनची तारीख आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी जाहीर केली आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आमचं शांततेचं युद्ध आहे त्याच मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची , ज्या केसेस मागे घ्यायच्या ठरल्या आहेत त्या मागे घ्यायच्या, शिंदे समितीचा कार्यकाळ एक वर्ष वाढवायचा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. नवीन मागणी कुठलीही नाही. आता सगळा मराठा एकवटला आहे. ६ जून पर्यंत सरकारने आरक्षण द्यावं ते झालं नाही तर आंदोलन बंद करणार नाही. कठोर आमरण उपोषण होणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.