सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेला ४ सप्टेंबरला अटक करण्यात आली. २६ ऑगस्टला राजकोट किल्ल्यावरची मूर्ती कोसळली. तेव्हापासून शिल्पकार जयदीप आपटे फरार होता. त्याला ४ सप्टेंबरला पोलिसांनी अटक केली. कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी तो पत्नी आणि आईला भेटायला आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सात पथकं तयार केली होती. जयदीप आपटेच्या अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज मालवण येथील न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.