चेंबूर : मुंबईतील चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे ५.१५ च्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. यात तळमजल्यावर दुकान होते आणि वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते.
या आगीमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ वर्षांच्या मुलीचा आणि १० वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. पॅरिस गुप्ता (७), मंजू प्रेम गुप्ता (३०), अनिता प्रेम गुप्ता (३९), प्रेम गुप्ता (३०), नरेंद्र गुप्ता (१०), विधी गुप्ता (१५), गितादेवी गुप्ता (६०) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत. ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी घरात अडकलेल्या कुटुंबियांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज पहाटे सिद्धार्थ नगरमध्ये आग लागली होती. या ठिकाणी खाली दुकाने होती. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर लोकं राहत होते. यात एकूण ७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दुकानात झोपलेल्या लोकांचा जीव वाचला आहे. नक्की आग कशामुळे लागली, याचा शोध आम्ही घेत आहोत. या आगीत दोन जणांना कोणतीही दुखापत झालेली नाही. तर ७ जणांचे शवविच्छेदन बाकी आहे, अशी माहिती डीसीपी हेमराजसिंह राजपूत यांनी दिली.