मुंबई : “बेळगावमध्ये मराठी भाषिकांबद्दल आणि कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न जो आहे? याबाबत शिवसेनेची भूमिका ही बेळगावमधील मराठी भाषिकांबाबतची राहिलेली आहे. मराठी भाषिकांच्या पाठिमागे शिवसेना खंबीर उभी आहे. तसेच बेळगावबाबत माझी भूमिका देखील जिव्हाळ्याची आहे. कारण १९८६ साली जे आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये मी देखील बेळगावच्या तुरुंगात होतो. तसेच मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री अशी संयुक्त बैठक घेतली होती. तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्यामुळे मराठी भाषिकांवर कोणताही अन्याय होणार नाही, अशी भूमिका कर्नाटक सरकारने घ्यावी, अशा सूचना तेव्हा अमित शाह यांनी दिल्या होत्या”, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं.
“मराठी भाषिकांचा मेळावा हा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला होता. मात्र, तो मेळावा होऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न कर्नाटक सरकारने केला. एक दडपशाही करण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला. जे आंदोलनकर्ते होते ते माजी आमदार किंवा माजी महापौर असतील त्यांच्यासह शेकडो मराठी भाषिकांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला. त्यामुळे याचा मी निषेध करतो. महाराष्ट्र सरकारची भूमिका एकच आहे की बेळगाव मधील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनता खंबीरपणे उभी आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.