मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14 डिसेंबर रोजी महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
महायुतीचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होऊन जवळपास आठवडा उलटला आहे. तरीही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातचा निर्णय झाला नाहीये. कोणत्या पक्षाला किती खाते मिळतील हे याचे गणित अद्याप समोर आले नाही. मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांना संधी देण्यात यावी, कोणत्या पक्षाला किती खाती दिली गेली पाहिजे. बाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पक्ष श्रेष्ठींसोबत बैठक होत आहे.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना गृहविभाग त्यांच्याकडे होता. आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे गृह विभागाची जबाबदारी द्यावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. पण, भाजप शिवसेनेला गृहखाते देण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर काय म्हणाले शिरसाट
एकनाथ शिंदे यांच दिल्लीला जाण्याच कोणतंही नियोजन नव्हतं. आमची यादी आधीच तयार असल्याने आम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. भाजपाची यादी दिल्लीत ठरते. त्यामुळे मुख्यमंत्री दिल्लीत गेले असतील. तसंच अजित पवार यांच्या संदर्भात काही निर्णय बाकी असेल.
शिवसेनेत कोणाला मंत्री पदाची संधी मिळते हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही सोपावला आहे. ते निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. कोणीही नाराज असण्याच काही कारण नाही. आमच्याकडे अडीच वर्षांचा कोणताही फॅामूर्ला ठरलेला नाही. नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यायची हा निर्णय देखील आम्ही त्यांच्यावर सोपवला आहे. येत्या १३-१४ तारखेला मंत्री मंडळाचा होईल, खात्यावरुन तिन्ही महत्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. इतर कोणालाही याबद्दल माहिती नाही.